2 इतिहास 17 : 1 (MRV)
आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले.
2 इतिहास 17 : 2 (MRV)
त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.
2 इतिहास 17 : 3 (MRV)
यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. ते बाल देवतेच्या भजनी लागला नाही.
2 इतिहास 17 : 4 (MRV)
आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
2 इतिहास 17 : 5 (MRV)
परमेश्वारने यहोशाफाटला यहूदाचा खंबीर राजा केले. यहूदा लोकांनी यहोशाफाटसाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला.
2 इतिहास 17 : 6 (MRV)
परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.
2 इतिहास 17 : 7 (MRV)
आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन - हईक, ओबद्या, जखऱ्या, नखनेल आणि मीखाया हे ते सरदार होत.
2 इतिहास 17 : 8 (MRV)
त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
2 इतिहास 17 : 9 (MRV)
हे सरदार, लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.
2 इतिहास 17 : 10 (MRV)
यहूदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करुन युध्दाला तोंड फोडले नाही.
2 इतिहास 17 : 11 (MRV)
काही पलिष्टे यहोशाफाटसाठी भेटी आणत. या राजाचे वर्चस्व ते जाणून असल्यामुळे रुपेही आणत. काही अरबी शेळ्या-मेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे 7,700 मेंढे आणि 7,700 बोकड त्याला दिले.
2 इतिहास 17 : 12 (MRV)
यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारे बांधली.
2 इतिहास 17 : 13 (MRV)
या कोठारांच्या गावामध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेममध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली.
2 इतिहास 17 : 14 (MRV)
आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे: यहूदातील सरदार असे: अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.
2 इतिहास 17 : 15 (MRV)
यहोहानानच्या हाताखाली 280,000 सैनिक होते.
2 इतिहास 17 : 16 (MRV)
जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
2 इतिहास 17 : 17 (MRV)
बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
2 इतिहास 17 : 18 (MRV)
यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.
2 इतिहास 17 : 19 (MRV)
ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19